

Bhandara Tempel
भंडारा : वैनगंगा आणि बावनथडीच्या संगम भागात असणाºया गायखुरी देवस्थानात १२ वर्षांनंतर गाईच्या खुरीचे दर्शन भाविकांना झाले आहे. काही भाविक व सामाजिक कार्यकर्ते या देवस्थानात पोहचले आहेत. देवस्थान जवळ चौफेर पाणी असल्याने धोका मात्र कायम आहे. मे महिन्यात देवस्थान धोक्यातून बाहेर निघणार आहे. नदीच्या पात्रातून पायदळ प्रवास सुरू झाला असला तरी पात्रात डोह पडले असल्याचे सांगितले जात आहे.
वैनगंगा नदीवरील वांगी गावाचे शेजारी बांधकाम करण्यात आलेल्या धरणात पाणी अडविण्यात आल्याने बपेरा गावच्या हद्दीत असणारे नदीच्या मध्यभागातील गायखुरी देवस्थान पाण्याखाली आले होते. गेल्या १२ वर्षापासून देवस्थान पाण्याखाली असल्याने दुरूनच भाविक दर्शन घेत होते. महाशिवरात्री यात्रेचे आयोजन नदीच्या काठावरील शिवपार्वती देवस्थानात करण्यात येत होते. आधीपासून नदीच्या पात्रात गायखुरी देवस्थानात यात्रेचे आयोजन होत असताना पाणी अडविण्यात आल्याने यात्रा उत्सव बंद करण्यात आली. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा १ आणि २ प्रकल्पात पाण्याचा उपसा वाढविण्यात आल्याने नदीच्या पात्रातील जलसाठा कमी होऊ लागला. पात्रातील जलस्तर घटल्याने गायखुरी देवस्थानातील खांब दृष्टीस पडले. त्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत आहे.
दगडावरील कोरलेले गाईच्या खुरी पाण्याखाली होते. नदीच्या पात्रातील पाण्याचा उपसा सुरू असल्याने आता कोरलेले दगड बाहेर पडले आहेत. गायखुरी देवस्थान पुर्णत: मोकळा झाला आहे. दगडांवर कोरलेल्या गाईच्या खुरी सलग १२ वषार्नंतर दृष्टीस पडल्या आहेत. दीर्घ कालावधीनंतर भाविक गायखुरी देवस्थानात पोहचले आहेत. नदीच्या पात्रातील पाण्याचा अंदाज भाविकांना नाही. यामुळे या देवस्थानात सामाजिक कार्यकर्ते सचिन खंगार यांनी पहिल्यांदा हजेरी लावली. देवस्थानच्या परिसरातील पाण्याचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. नदीचे पात्र पायदळ प्रवासासाठी खुला झाला असला तरी खडकाळ भागात पाणी आहे. तोल गेल्यास धोकादायक आहे. मे महिन्यात नदी पात्रातील पाणी कमी करण्यात येणार आहे. या महिन्यात धोका राहणार नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भाविकांनी दर्शनासाठी घाई करू नये, अशा सूचना दिल्या जात आहेत.
सध्या देवस्थानात दगडावरून जावे लागत आहे. गायखुरी देवस्थानचा चबुतरा बाहेर पडला असला तरी चौफेर ५ फूट पाणी आहे. यामुळे दर्शनासाठी जाताना धोकादायक झाले आहे. नदीचे पात्र रिकामे होत असताना भाविकांनी दर्शनासाठी जोखीम पत्करण्याचे प्रयत्न करू नये. गायखुरी कोरलेला दगड डोहाचे शेजारी असून ५ फूट पाण्याने वेढलेला आहे. देवस्थानचे चबुतरापर्यंत जाता येते. परंतु गाईच्या खुरी पर्यंत जाणे धोकादायक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन खंगार यांनी सांगितले.