

Tumsar Panchayat Samiti Fire
भंडारा: तुमसर येथील पंचायत समितीच्या इमारतीतील रेकॉर्ड रूमला आज (दि.२६) सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत अनेक महत्त्वाचे दस्तावेज आणि फाईल्स जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग अपघाताने लागली की कोणी हेतुपुरस्सर लावली, याबाबत प्रशासन व पोलिस तपास करत आहेत. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून ही घटना संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
आज सकाळी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, महत्वाच्या शासकीय कागदपत्रांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून तपासानंतरच आग कशी लागली याबाबत स्पष्टता येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.