

Bhandara Crime Update
भंडारा : पत्नीच्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी देशीकट्टयासह सराईत गुंडांना घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने एका महिलेसह चार जणांना अटक केली. ही कारवाई लाखनी तालुक्यातील मानेगाव सडक येथे करण्यात आली.
आकाश उर्फ डिक्रा रमेश महालगावे (१९) रा. अभ्यंकर नगर तुमसर, गौरव उर्फ विक्की कृष्णा राखडे (२०) रा. दुर्गानगर तुमसर, अनिकेत उर्फ रितीक अर्जुन बांते (२४) रा. बाबा मस्तानशाह वॉर्ड भंडारा, व एक महिला अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एक पिस्टल, तीन जिवंत काडतूस, एक फायर केलेला काडतूस, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन, पाच मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी आपले पथक भंडारा बसस्थानक परिसरात पाठविले. बसस्थानकातून आरोपी पळून गेल्यानंतर त्यांचा पाठलाग करण्यात आला. त्यानंतर लाखनी तालुक्यातील मानेगाव/सडक येथे चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, पोलिस हवालदार प्रदिप डहारे, सतिश देशमुख, पंकज भित्रे, सचिन देशमुख, शुभम ठाकरे, आशिष तिवाडे, किर्ती तिवारी यांनी केली.
यातील आरोपी आकाश उर्फ डिक्रा रमेश महालगावे याचे दोन आठवड्यापूर्वी लग्न झाले. परंतु, त्याच्या पत्नीचा जुना प्रियकर तन्मय मेंढे रा. गोठनगाव हा तिला वारंवार फोन करुन ब्लॅकमेल करीत होता. त्याला धडा शिकविण्यासाठी त्याने तडीपार असलेला गौरव उर्फ विक्की कृष्णा राखडे याच्याजवळ असलेली पिस्टल घेऊन अनिकेत उर्फ रितीक अर्जुन बांते याच्यासोबत तन्मय मेंढे याचा काटा काढण्यासाठी चौघेही गोंदिया जिल्ह्यातील गोठनगाव येथे निघाले होते. परंतु, स्थानिक गुन्हे शाखेला वेळीच माहिती मिळाल्याने त्यांचा हा कट फसला. यातील आकाश महालगाव, गौरव राखडे व अनिकेत बांते हे खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न करण्यात सक्रिय आहेत.