पवनी तालुक्यातील सावरला येथे जंगल शिवारात वाघाने गुराख्यावर हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी (दि.1) सकाळी १० च्या सुमारास घडली. या घटनेनंतर जंगलशेजारील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुसन आत्माराम अवसरे (वय.५५ रा. देऊळगाव ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर) असे मृत गुराख्याचे नाव आहे.
सावरला हे गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. रविवारी सकाळच्या सुमारास सिमेवरील देऊळगाव येथील कुसन अवसरे हा गुराखी गुरे चारण्यासाठी सावरला व देऊळगावच्या सिमेवरील जंगलात गेले होते. यावेळी दडी मारुन बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कुसन याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती पवनी पोलिस स्टेशन व पवनी वन विभागाला देण्यात आली. पुढील कारवाई पवनी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रीतम येवले करित आहेत.