
BSNL Transformer Fire
भंडारा : लाखांदूर-अर्जुनी रस्त्यालगत असलेल्या बीएसएनएल कार्यालय आवारातील ट्रान्सफार्मरला आग लागल्याची घटना १८ जून रोजी सायंकाळी घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.
लाखांदूर येथील बीएसएनल कार्यालय आवारात विद्युत ट्रान्सफार्मर बसविण्यात आला आहे. त्या ट्रान्सफार्मरमध्ये सायंकाळच्या दरम्यान अचानकपणे शार्टसर्किट झाल्याने आगीची ठिणगी ट्रान्सफार्मरखाली असलेल्या पालापाचोळ्यावर पडल्याने क्षणातच आगीचा वणवा उडाला.
आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांनी लाखांदूर नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या विभागाला माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होवून आगीवर नियंत्रण मिळविले.
वेळीच मिळालेली मदत आणि नागरिकांची तत्परता यामुळे मोठे नुकसान टळले. या घटनेची माहिती वीज विभाग व आपत्ती व्यवस्थापण विभागाला देण्यात आली. यावेळी लाखांदूर नगरपंचायतचे कर्मचारी निखिल हाडगे, रमेश कापगते, शुभम भेंडारकर, कमलेश प्रधान, लाखांदूर येथील लाईनमन सुनील कोहळे, विलास थुराम हे उपस्थित होते.