भंडारा : भंडारा विधानसभेची जागा भाजपच्या हक्काची असताना शिंदे शिवसेना पक्षाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. कार्यकर्त्यांनी भोंडेकर यांना अहंकारी संबोधत निवडणुकीत त्यांच्या बाजूने काम करणार नसल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Assembly Polls)
भंडाराच्या जागेसाठी महायुतीने उमेदवार न बदलल्यास भाजपच्या पाच उमेदवारांपैकी एकाला उभे करून त्यांना विजयी करू, असा इशाराही दिला. गुरुवारी दुपारी शहरातील त्रिमूर्ती चौकात भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपच्या बंडामुळे नरेंद्र भोंडेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यावेळी भाजपचे भंडारा तालुका अध्यक्ष विनोद बांते, भंडारा विधानसभा प्रमुख अनुप ढोके, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष आशु गोंडाणे, रुबी चड्डा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विनोद बांते म्हणाले की, जलपर्यटनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात भोंडेकर यांनी फलकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव लिहिले नव्हते. त्यांनी जाणीवपूर्वक भाजपला डावलले. ते भाजपच्या विरोधात काम करत आहेत. महायुतीत असतानाही भोंडेकर यांनी मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीत भोंडेकर यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात काम केल्याने भाजप उमेदवाराचा पराभव झाला. २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती असताना भोंडेकर यांनी शिवसेना सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. अशा स्थितीत भोंडेकरांना सोडून अपक्ष उमेदवारासाठी काम केले तर चुकीचे कसे होईल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आशु गोंडाणे म्हणाले की, आम्ही आमच्या भावना आणि भोंडेकरांच्या तक्रारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्या आहेत. याआधीही भोंडेकरांच्या तक्रारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात नरेंद्र भोंडेकर यांच्याबाबत नकारात्मक भावना आहे. अशास्थितीत महायुतीचा उमेदवार भाजपचाच असावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भोंडेकर यांची उमेदवारी रद्द न केल्यास भाजपच्या गटातील स्वतंत्र उमेदवार उभा करुन त्यांना विजयी करु, असा इशारा त्यांनी दिला.
भाजपच्या या बंडामुळे नरेंद्र भोंडेकर यांच्या विजयाच्या वाटेत खोडा येण्याची शक्यता आहे. भंडारा विधानसभेत शिंदे शिवसेना पक्षाच्या तुलनेत भाजपचे संघटन आणि संपर्क मोठा आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आधीपासूनच नरेंद्र भोंडेकर यांच्याविषयी रोष आहे. याशिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारीही भोंडेकर यांच्यावर नाराज आहेत. याचे परिणाम निवडणुकीत कसे उमटतात, याकडे लक्ष लागून आहे.