Maharashtra assembly polls : श्रीगोंद्यात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती?

शरद पवारांचा शिलेदार अपक्ष लढणार ; पंचरंगी लढत; पाचपुते, नागवडे, शेलार, जगताप मैदानात
Maharashtra Assembly polls
Maharashtra Assembly polls file photo
Published on
Updated on

श्रीगोंद्यातून डॉ. प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर करत भाजपने बाजी मारताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नागवडे दाम्पत्याने सोडचिठ्ठी देत ‘मशाल’ हाती धरली आहे. शर्थीचे प्रयत्न करूनही मविआतून उमेदवारी न मिळालेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शिलेदार माजी आ. राहुल जगताप यांनी अपक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेला सांगलीमध्ये जसा प्रकार घडला तसाच प्रकार श्रीगोंदा विधानसभेला दिसणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

भाजपने सर्वात अगोदर विद्यमान आ. बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा यांची उमेदवारी श्रीगोंद्यातून जाहीर केली. त्यानंतर त्यांच्या विरोधात कोण? याची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अनुराधा नागवडे यांच्यासह राजेंद्र नागवडे यांनी शिवसेना (उबाठा) प्रवेश केला. पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्याचे छायाचित्र सोशल मिडियावर प्रसारीत झाले. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीच्या प्रतिक्षेत असलेले माजी आ. राहुल जगताप यांनी ‘आता थांबयाचे नाही’ असा पवित्रा घेत अपक्ष उमेदवारीचे संकेत दिले आहेत. जगताप यांनी अपक्ष उमेदवारी केल्यास महाविकास आघाडीत बिघाडी होणार असून त्यातून उबाठा सेनेच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्यासमोर अडचणी निर्माण होणार आहेत.शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राहुल जगताप यांच्यामागे पाठबळ उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्रीगोंद्यात आता सांगली पॅटर्नची पुनर्रावृत्ती झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

याशिवाय वंचितकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यासह सुवर्णा पाचपुते याही अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बबनराव पाचपुते लढणार नाहीत, त्यांच्याऐवजी चिरंजीव विक्रम यांच्या उमेदवारीसाठी पाचपुते कुटुंब पक्षाकडे आग्रही होते. सुवर्णा पाचपुते याही भाजपकडे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. मात्र भाजपने दोघांनाही नाकारत प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली.

अनेक वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना डावलल्याने त्याही अपक्ष उमेदवारीवर ठाम आहेत. महाविकास आघाडीसोबतच महायुतीच्या उमेदवारालाही बंडखोरांमुळे अडचण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वंचितचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांची ओबीसी नेते म्हणून ओळख असून 2009 मध्ये उमेदवारी करताना त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. आता ते पुन्हा विधानसभेत नशीब अजमावत आहेत.

2019 मधील विधानसभा निवडणुकीत घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आ. बबनराव पाचपुते यांच्या समोर कडवे आव्हान उभे केले होते. या निवडणुकीत शेलार यांचा अवघ्या 4 हजार 750 मतांनी निसटता पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. तेथून ते पुन्हा काँगेसमध्ये परतले. श्रीगोंद्यातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी तेही प्रयत्नशील होते.

महाविकास आघाडीची उमेदवारी माजी आमदार राहुल जगताप यांनाच मिळेल असे वाटत असतानाच उबाठा सेनेकडे ही जागा गेली अन् अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळाली. श्रीगोंदा बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, खादी ग्रामोद्योग यासह इतर छोट्या संस्था, ग्रामपंचायतीमध्ये एकहाती सत्ता मिळवत राहुल जगताप हे मोर्चेबांधणी करत विधानसभेची तयारी करत होते. राष्ट्रवादी फुटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांना ‘ऑफर’ दिली असतानाही ते शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. लोकसभेच्या निवडणुकीवेळी प्रचंड दबाव असतानाही जगताप यांनी शरद पवारांशी एकनिष्ठ राहत नीलेश लंके यांच्या विजयासाठी धावपळ केली. त्यामुळेच श्रीगोंद्यातून लंके यांना 32 हजाराचे मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य पाहता राहुल जगताप यांच्यासाठी ‘अब मुंबई दूर नाही’ असे चित्र असतानाच त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट झाला.

मविआतील श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादी (शरद पवार) कडे असताना ती जागा वाटपात शिवसेनेला (उबाठा) मिळावी यासाठी खा. संजय राऊत यांनी आग्रही भूमिका घेतली. प्रसंगी आघाडीत बिघाडी होण्याची आक्रमक भूमिका मांडली. त्यामुळे शरद पवार यांनी दोन पाऊल मागे घेत श्रीगोंद्याची जागा शिवसेनेला सोडली. परिणामी राहुल जगताप यांच्या पदरी निराशा पडली. आता त्यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. ‘आता माघार नाही’ अशी घोषणा देत पुढची दिशा ठरविण्यासाठी आज गुरूवारी (दि.24) कार्यकर्त्यांची बैठक बोलविली आहे.

भाजमध्ये असलेले नागवडे दाम्पत्य काँग्रेसमध्ये आले. राजेंद्र नागवडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तर अनुराधा नागवडे महिला जिल्हाध्यक्ष होत्या. मात्र विधानसभेच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसचा हात सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत नागवडे यांनी विधानसभा उमेदवारीचा शब्द घेतला. मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपला सुटली. भाजपकडून डॉ. प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर शरद पवारांशी यांच्याशी संपर्क साधत महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र तेथे उमेदवारी मिळत नसल्याचे दिसताच ‘शिवबंधन’ हाती बांधण्याचा निर्णय घेतला. बुधवारी शिवसेनेत प्रवेश अन् लगेचच त्यांना उमेदवारी मिळाली आहे.

अडीच तासांच्या चर्चेनंतर राहुल जगताप श्रीगोेंद्यात

मविआच्या जागा वाटपात श्रीगोंद्याची जागा मिळावी यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले. मात्र खा. संजय राऊत यांनी श्रीगोंदा शिवसेनेलाच मुद्दा लावून धरल्याने पेच निर्माण झाला. त्यानंतर शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष जयंत पाटील, खा. नीलेश लंकेे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासोबत राहुल जगताप यांच्याशी चर्चा केली. अडीच तासांच्या चर्चेनंतर राहुल जगताप हे शरद पवारांचे चरणस्पर्श करत श्रीगोंद्याकडे रवाना झा ले.

खा. लंकेंच्या भूमिकेकडे लक्ष

लोकसभेच्या निवडणुकीत नीलेश लंके यांच्या विजयात राहुल जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. राहुल जगताप यांच्या उमेदवारीसाठी खा. लंके यांनी शरद पवारांकडे आग्रह धरला. कुठल्याही जागेवर तडजोड करा, पण राहुल जगताप यांना श्रीगोंद्यातून उमेदवारी द्या, अशी मागणी खा.लंके यांनी केली, पण त्यांच्या पदरी निराशा पडली. लोकसभा निवडणुकीवेळी नागवडे यांनी खा. लंके यांच्या विरोधी भूमिका घेतली होती. आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून खा. लंके हे अनुराधा नागवडे यांचा प्रचार करणार की वेगळी भूमिका घेणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागून असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news