

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत जिल्हा महिला रुग्णालय अखेर १२ वर्षांनंतर महिलांच्या सेवेत येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी १८ आणि २० जून रोजी सलग दोन वेळा रुग्णालयाची पाहणी करून कामांची प्रगती तपासली. काही विभागांची अंतिम मंजुरी मिळताच रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सन २०१३ मध्ये मंजूर झालेल्या १०० खाटांच्या महिला रुग्णालयासाठी प्रारंभी योग्य जागाच निश्चित होऊ शकली नव्हती. परिणामी, काम सुरू होण्यास मोठा विलंब झाला. २०१९ मध्ये ६१ कोटी खर्चाच्या अंदाजासह तत्कालीन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांत रुग्णालय सुरू करण्याचे उद्दिष्ट ठरले होते. पण प्रत्यक्षात ६ वर्षे उलटून गेल्यानंतरही सेवा सुरू होऊ शकली नव्हती.
दरम्यान, या इमारतीत भंडारा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयही सुरू करण्यात आले आहे. मात्र महिला रुग्णालयाच्या प्रत्यक्ष सुरुवातीची तारीख वारंवार पुढे ढकलली जात होती. यामुळे भंडारा तसेच बालाघाट (मध्यप्रदेश) व नागपूरच्या सीमावर्ती भागांतील महिलांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागत आहे. आता लवकरच हे रुग्णालय सुरू होणार असल्याने महिला रुग्णांना दिलासा मिळाला आहे.