

Tigress Presence Tumsar Bhandara
भंडारा: तुमसर शहराजवळील हसारा ते खापा या मुख्य रस्त्यावरील परिसरात आज (दि.३१) दुपारी वाघिणीने बछड्यासोबत दर्शन दिल्याची बातमी पसरली आणि संपूर्ण परिसरात भीतीसह कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या घटनेबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे आता एक नवा संभ्रम निर्माण झाला असून, वनविभागाने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
३१ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास हसारा-खापा रोडवर शेतशिवारात वाघिण आणि बछडा दिसल्याची चर्चा सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच तुमसर वनविभागाचे पथक तातडीने सक्रिय झाले.
वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. राहंगडाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने संबंधित परिसरात गस्तीसाठी पाठवण्यात आले असून वाघाच्या पावलांचे ठसे शोधण्याचे काम सुरू आहे. परंतु, या घटनेबाबत जो फोटो प्रसारित होत आहे, त्यावरून वनविभागाने शंका उपस्थित केली आहे. फोटोत दिसणारा तो प्राणी नेमका वाघच आहे का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.