

Tumsar Chikhla MOIL protest,
भंडारा : खनिजसंपत्तीने समृद्ध अशा तुमसर तालुक्यातील चिखला मॉईल येथील भूमिगत खाणीत काम करणाऱ्या कंत्राटी मजुरांनी कंत्राटदाराकडून आर्थिक पिळवणूक झाल्याचा आरोप करीत आपला हक्काचा पगार, कपातीचा हिशोब आणि दिवाळी बोनस न मिळाल्याने संताप व्यक्त करत खानप्रबंधक कार्यालयासमारे ठिय्या आंदोलन केले.
मॉईल प्रशासनाने खाणीत काम करण्यासाठी सितासावंगी येथील एका स्थानिक कंत्राटदाराला मजुर पुरविण्याचे कंत्राट दिले होते. या कंत्राटाअंतर्गत शेकडो मजुरांना खाणीत कार्यरत करण्यात आले. मात्र, या मजुरांच्या दैनिक मजुरीतून संबंधित कंत्राटदार दररोज प्रति मजूर २०० ते २५० रुपयांची अवैध कपात केली जात असल्याची मजुरांची ओरड आहे. त्याचबरोबर दिवाळीचा बोनस न देता फसवणूक केल्याचेही समोर आले आहे.
एका शिक्षित तरुण मजुराने सांगितले की, खाणीत तब्बल अडीचशेहून अधिक मजूर कार्यरत असून, सर्वांच्या मानधनातून कपात होत आहे. कंत्राटदाराच्या या गैरव्यवहारातून लाखो रुपयांचा आर्थिक अपहार होत असल्याची तक्रार आहे. बहुतेक मजूर हे आदिवासी आणि अशिक्षित असल्याने कंत्राटदार त्यांचा गैरफायदा घेत असून कामावर घेण्यासाठीही देवाणघेवाण केल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून नवीन निविदा काढण्याची मागणी मजुरांनी केली आहे.
संतप्त मजुरांनी सितासावंगी येथील खानप्रबंधक कार्यालय गाठले. मजुरांची मोठी गर्दी पाहताच संबंधित व्यवस्थापक आणि एजंट कार्यालयातून निघून गेले, अशी माहिती मिळाली. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी मजुरांची समजूत घालून वेळ मागितल्याचे सांगण्यात आले. मजुरांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदार कामावर जाणाऱ्या मजुरांची उपस्थिती नोंदवतो, मात्र त्या रेकॉर्डमध्ये बोगस सुट्ट्या, अनधिकृत कपात आणि ईपीएफ रकमेतील गोंधळ असल्याचे मजुरांनी निदर्शनास आणून दिले. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या नजरेत गेल्यानंतर तपास सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मजुरांना हक्काचे वेतन आणि बोनस त्वरित देण्यात न आल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दिवाळीसारख्या सणात मजुरांना त्यांच्या मेहनतीचे पैसे न मिळाल्याने दिवाळी अंधारात गेली, अशी हळहळ त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.