

Trap Camera Tiger Movement Captured
भंडारा : साकोली वनपरिक्षेत्रातील जंगलांमध्ये दोन पट्टेदार वाघांचा मुक्त संचार सुरू असल्याचे वनविभागाच्या कॅमेऱ्यांतून समोर आले आहे. उमरी सहवनक्षेत्रातील महालगाव बिटात नर वाघ, तर सानगडी सहवनक्षेत्रातील सिरेगाव बिटात वाघिणीच्या हालचाली टिपण्यात आल्या आहेत. जंगलालगतच्या गावांच्या परिसरात या दोन्ही वाघांचा वावर वाढला असून पाळीव जनावरांची शिकारही झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उमरी, महालगाव, सानगडीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, नर वाघाचा महालगाव परिसरात, तर वाघिणीचा पापडा, केसलवाडा आणि सिरेगाव बिटात संचार आहे. पळसगाव, नैनपूर, सालई आणि झाडगाव परिसरातील जंगलांमध्येही त्यांच्या हालचाली आढळल्याचे सांगण्यात येते. गोंदिया जिल्ह्यातील भिवखिडकी गावालगतच्या जंगलापर्यंत या वाघांचा वावर असल्याची माहिती आहे. नवेगावबांधलगतच्या बोदराई अभयारण्यातून हे दोन्ही वाघ या भागात आले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जंगलालगतच्या गावांमध्ये पाळीव जनावरांवर वाघांनी हल्ले करून त्यांची शिकार केल्याच्या घटना समोर आल्याने पशुपालकांमध्ये अस्वस्थता आहे. जंगलातील हरणे, नीलगाय आणि रानडुकरांची उपलब्धता कमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाघांचा नैसर्गिक अधिवास आणि खाद्यसाखळी याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात मका आणि उसाची पिके वाढल्यानंतर दाट पिकांमध्ये वन्यप्राण्यांना लपण्यासाठी अनुकूल जागा मिळू शकते. परिणामी, जंगलातून शेतशिवाराकडे त्यांच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सानगडी परिसरातील वाघांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वनविभागाने ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियमित निरीक्षण करावे, जंगलालगत गस्त वाढवावी आणि संवेदनशील गावांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे. तसेच धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे, पशुपालकांना सतर्क करणे आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवणे आवश्यक आहे. वाघांच्या अधिवासाचे संरक्षण करताना मानवी जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वनविभागाने वेळीच ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
साकोली तालुक्यातील ब्राह्मणी येथे दिवाळीच्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धानकापणीचा हंगाम सुरू असतानाच शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाल्याने वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून संवेदनशील शेतशिवारात वनरक्षकांचा पहारा ठेवला आहे. वनकर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत धानकापणीची कामे सुरू करण्यात आली आहेत.