

Bhandara Forest Department
भंडारा : लाखांदूर वनपरिक्षेत्रांतर्गत चिचाळ-बारव्हा येथे गावालगत असलेल्या बांबू डेपो परिसरातील पडक्या घरात शिरलेल्या अस्वलाला वनविभागाच्या पथकाने सुरक्षितपणे जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. मंगळवारी (१० नोव्हेंबर) सकाळी ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, खोलमारा येथील पोलिस पाटलांनी सकाळी ६.३० वाजता वनविभागाला अस्वल पडक्या घरात दडून बसल्याची माहिती दिली. माहिती मिळताच लाखांदूर वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी आणि शीघ्र बचाव दलाचे (आरआरटी) सदस्य घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अस्वलाला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या.
सदर ठिकाण गावालगत असून अस्वलाचा नैसर्गिक अधिवास दूर असल्याने तसेच गर्दीमुळे अस्वलाकडून नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नर अस्वलाला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. अक्षय अडकिने यांनी अस्वलाची वैद्यकीय तपासणी केली. अस्वल शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला लाखांदूर वनक्षेत्रातील नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
हे बचावकार्य वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने यांच्या नेतृत्वात पार पडले. क्षेत्र सहायक जे. जी. नागपुरे, एस. एन. गिºहेपुंजे, सी. जी. जारवाल, टी. एस. डावकोरे, जी. एम. काकरवाल, आरआरटीचे सदस्य तसेच गावचे सरपंच, पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी या मोहिमेत सहकार्य केले.