

भंडारा: भंडारा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दंडाच्या उद्दीष्टप्राप्तीसाठी आता रुग्णांना घेऊन जाणाऱ्या शासकीय रुग्णवाहिकांना टारगेट केले आहे. रस्त्यावर धावणाऱ्या रुग्णवाहिकांना थांबवून त्यांच्यावर दंड आकारला जात आहे. वाहन शासकीय असल्याने सर्व कागदपत्रे आरोग्य विभागाकडे असतात, असे सांगूनही आरटीओ अधिकारी ऐकत नसल्याचा संताप शासकीय रुग्णवाहिकर चालकांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या खासगी कंत्राटदाराच्या रुग्णवाहिका, १०२ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिका व शेकडो खासगी रुग्णवाहिका आहेत. यातील १०२ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकांचे कागदपत्रे आरोग्य विभागाकडे जमा असतात. या रुग्णवाहिकांची देखभाल दुरुस्ती शासनस्तरावर होत असते. या रुग्णवाहिकाचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना तेवढा असतो.
काही दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला आग लागली होती. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी १०८ क्रमांकाच्या आणि खासगी रुग्णवाहिकांची तपासणी सोडून १०२ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. पवनी तालुक्यातील कोंढा आरोग्य केंद्राच्या शासकीय रुग्णवाहिकांवर कागदपत्रे नसल्याची सबब पुढे करुन दोनदा दंड आकारण्यात आला. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेवरही कारवाई करण्यात आली.
भर रस्त्यात रुग्ण घेऊन जाणाऱ्या शासकीय रुग्णवाहिकांना तासन-तास थांबविण्यात येत असल्याने रुग्णांचीही हेळसांड होत आहे. रुग्णवाहिका चालकांकडून कागदपत्रे आरोग्य विभागाकडे असल्याचे सांगूनही अधिकारी ऐकत नसल्याची तक्रार चालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. आरटीओ अधिकारकर्यांच्या अशा प्रकारामुळे चालकांनी संताप व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी खासगी रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकांचे सर्व कागदपत्रे, वाहनांची देखभाल दुरुस्ती संबंधित वाहनमालकांना करावी लागते. परंतू, अशा रुग्णवाहिकांची तपासणी करणे सोडून फक्त शासकीय रुग्णवाहिकांवर कारवाई करण्यामागचा हेतू काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.