

भंडारा पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खरबी नाका येथे वंजारी राईस मिल समोर आरटीओ वाहनाच्या धडकेत तीन वर्षाय बालक ठार. ही घटना मंगळवारी (दि.९) सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. ठार झालेल्या बालकाचे नाव पूर्वांश रामकृष्ण वंजारी (रा. खरबी नाका) असे आहे.
माहितीनुसार, जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका ट्रकमध्ये रेती ओव्हरलोड असल्याचा संशयावरून ट्रकला वजन काटा करण्यासाठी खरबी येथील राईस मिल वर घेऊन जात होते. भंडारा आरटीओ.विभागाचे चार चाकी स्कॉर्पिओ क्रमांक एम. एच.०४ के.आर.६४३६ चे वाहन पुढे जात होते. राईस मिलच्या समोरच रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या पूर्वांश रामकृष्ण वंजारी याला धडक लागली. धडकेत तो रस्त्याचा कडेला पडल्याने गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मृत पूर्वांश रामकृष्ण वंजारी (रा. खरबी नाका) वंजारी राईस मिल मधील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराचा एकुलता एक मुलगा होता. या अपघाताची माहिती गावात होताच, गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली व आरटीओ अधिकाऱ्यांचा वाहन चालकावर अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.
त्यानुसारच जवाहर नगर पोलिसांनी भंडारा परिवहन विभागाच्या आरटीओ वाहन क्रमांक एम. एच.०४ के.आर.६४३६ चे (MH 04 KR 6436) वाहन चालक काशीद मिर्झा याचेवर भारतीय न्याय संहिता कलम १०६,२८१(106, 281) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अपघाताच्या वेळी या आरटीओ परिवहन मंडळाचे इन्स्पेक्टर वाहिद अब्दुल चाऊस हे गाडीत होते तर वाहन चालक हा मागील अनेक वर्षापासून रोजंदारीवर कंत्राटी पद्धतीने वाहन चालवत आहे. या घटनेमुळे ठाणा खरबी परिसरात आरटीओ विरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे, सहाय्यक ठाणेदार पुरुषोत्तम राठोड, तथा पोलीस कर्मचारी संदीप बंबावले करीत आहेत.