

भंडारा : शहापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमधून ३०७ किलो अफूचा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते. यात अटक केलेल्या आरोपींकडून हा साठा एका ढाबामालकाकडे देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. तसेच तसेच तीनदा अफूची तस्करी केल्याचीही माहिती संशयितांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ढाबामालकाचा शोध घेऊन त्यालाही जेरबंद केले. भजनलाल नेमीचंद यादव (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या ढाबामालकाचे नाव आहे.
२९ जुलै रोजी शहापूर येथील ग्रँड हॉटेलमध्ये एका चारचाकी वाहनातून ३०७ किलो अफू डोडाचा साठा स्थानिक गुन्हे शाखा आणि जवाहरनगर पोलिसांनी जप्त केला होता. यात राजस्थानातून आलेल्या दोघांना अटक करण्यात आली होती. परंतु, या अफूचा साठा कोण स्वीकारणार होता, याची माहिती आरोपी सांगत नव्हते. संभाषणासाठी ते झिंग अॅपचा वापर करीत होते. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी यातील आरोपी दिलीप गंगाराम विश्नोई याची सखोल विचारपूस केली असता, त्याने यापूर्वी दोनदा अफूची खेप भंडारा येथे आणल्याची कबुली दिली. या अफूचा साठा एका राजस्थानी व्यक्तीला देण्यात येणार असल्याचीही माहिती त्याने पोलिसांना दिली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने माथनी टोल ते साकोली टोल प्लाझाची तपासणी केली. तसेच भंडारा ते देवरीपर्यंत आरोपीने सांगितल्याप्रमाणे राजस्थानी ढाब्यांची तपासणी केली. संशयित आरोपी दिलीप विश्नोई याला घेऊन शनिवारी (दि.२) तपास करत असताना विश्नोई याने राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळमोह येथील विरतेजा राजस्थानी ढाब्याचा मालक भजनलाल यादव याच्यासह त्याचे चारचाकी वाहन ओळखले. व त्यालाच आपण अफूची तस्करी करणार होतो, अशी माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी भजनलाल याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने आरोपीकडून तीनदा अफूची खेप मागविल्याची माहिती पोलिसांना दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, जवाहरनगरचे ठाणेदार भिमाजी पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव पुंजरवाड, विजय राऊत, रमेश बेदुरकर, श्रीकांत मस्के, अंकूश पुराम, जगदिश श्रावणकर, योगेश पेठे, दिनेश राऊत यांनी केली.