

पणजी : राज्यातील समुद्रकिनारी पर्यटकांसाठी ड्रग्जचा सापळा लावणार्या ड्रग्ज तस्करांनी आता विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन नवीन मोहीम उघडली असून या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकण्याचा प्रयत्न करणार्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यातील एक प्रकरण शिरगाव, तर दुसरे तुये येथील आहे.
शिरगाव (डिचोली) येथील रेल्वे ट्रॅकजवळ पोलिसांनी मंगळवार दि. 17 जून रोजी रात्री 8.37 ते 18 जूनच्या पहाटे 3.13 दरम्यान पाळत ठेवली होती.यावेळी पोलिस पथकाने हर्षदीप दीपक घाणेकर (वय 19, पोयरा, मये) याला 2,900 रुपये किमतीच्या 29 ग्रॅम गांजासह रंगेहाथ पकडले.
दुसर्या प्रकरणात सोमवार दि.16 जून रोजी सायंकाळी 7.45 ते 9.30 या वेळेत तुये येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाजवळ पाळत ठेऊन शिवानंद शाम गावडे (वय 28, पार्से,पेडणे) याला 70 हजार रुपयांच्या 732 ग्रॅम गांजासह रंगेहात पकडले. हा गांजा त्याने आपल्या दुचाकीच्या (जीए 11 एफ 7769) डिकीत लपवला होता.त्यामुळे पोलिसांनी ही दुचाकीही जप्त केली आहे. शिरगाव येथील ड्रग्ज प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अप्पा शिंदे यांनी, तर तुये येथील ड्रग्ज प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रथमेश पार्सेकर यांनी तक्रार दाखल केली.दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या दोन्ही प्रकरणांमध्ये संशयितांनी विद्यार्थ्यांना अमलीपदार्थ विकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात असे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. ही मोहीम सुरूच राहील, असे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी म्हटले आहे.