भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भंडारा पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार घेताच नुरुल हसन यांनी गुन्हेगारांविरोधात मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांची परेड घेण्यात आली. यापुढे संपूर्ण अवैध धंदे बंद करण्यात यावे, अन्यथा कठोर कारवाई करु, असा इशारा गुन्हेगारांना देण्यात आला.
पोलिस दलाच्या अभिलेखावरील दारुबंदी, जुगार, सट्टा, रेती तस्कर, गो-तस्कर, एनडीपीएस तसेच चोरी, घरफोडी, दुचाकी, मोटरपंप चोरी आदी गुन्ह्यातील गुन्हेगारांना गुन्हेगारी प्रवृत्ती सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी समुपदेशनासह चांगलाच दम दिला.
अभिलेखावरील गुन्हेगारांचे यापुढे कोणत्याही गुन्ह्यात नाव आढळून आल्यास गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. चोरी, अवैध दारु, जुगार, सट्टा, वाळू तस्करी, एनडीपीएस यासह अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रीय असलेल्या एकूण १२७ गुन्हेगारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलाविण्यात आले होते. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या परेडमध्ये पोलिस अधीक्षकांनी व्यक्तीश: बोलून समुपदेशन केले. ही एक संधी असून यापुढे गुन्हेगारांचे वर्तन सुधारले नाही. तर त्यांच्याविरुद्ध हद्दपार, एमपीडीए सारख्या गंभीर कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या कार्यपद्धतीमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाल्याचे चित्र आहे.