

भंडारा : तालुक्यातील आंबाडी गावात भरदुपारी चहाच्या टपरीवर बसलेल्या नागरिकांवर रानडुकराने हल्ला करून एका व्यक्तीला जखमी केले. या संपूर्ण घटनेचा थरार टपरीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास आंबाडी गावातील काही नागरिक नेहमीप्रमाणे चहाच्या टपरीवर बसून गप्पा मारत होते. यादरम्यान अचानक भरधाव वेगाने एक रानडुक्कर त्या परिसरात धावत आले. अचानक समोर आलेल्या रानडुकराला पाहून नागरिकांची भंबेरी उडाली आणि अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळ काढला. या गोंधळात एक इसम रानडुकराच्या तावडीत सापडला. रानडुकराने त्याला जोरदार धडक दिल्याने तो खाली कोसळून जखमी झाला. त्यानंतर रानडुक्कर तेथून वेगाने पसार झाले. उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमी इसमाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण हा संपूर्ण थरारक प्रकार टपरीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गावाच्या वस्तीपर्यंत रानडुक्कर पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करून रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही काळापासून ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.