Bhandara News : वादळाने घरांचे छत उडाले, दोन जनावरे ठार

Bhandara News : वादळाने घरांचे छत उडाले, दोन जनावरे ठार
Published on
Updated on

भंडारा : भंडारा तालुक्यातील जुनी पिपरी आणि चिचोली परिसरात गुरुवारी (दि. २८) दुपारच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरांवरील छप्पर उडाली असून, दोन जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गुरुवारी सकाळपासून कडक ऊन असताना दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण तयार होऊन सोसाट्याचा वारा वाहू लागला. या वादळाचा तडाखा जवाहरनगर परिसरातील जुनी पिपरी आणि चिचोली या गावांना मोठ्या प्रमाणात बसला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील पत्रे आणि छप्पर हवेत उडून गेले, यामुळे ग्रामस्थांची मोठी धावपळ उडाली.

वादळाच्या तडाख्यात दोन जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, तर अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. यामुळे संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news