

भंडारा: विहिरीत असलेल्या मोटारीच्या दुरुस्तीसाठी उतरलेल्या मेकॅनिकचा विषारी वायुमुळे गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला. ही घटना लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथे आज उघडकीस आली.
छगन गोटेफोडे (४५) रा. पालांदूर असे मृताचे नाव आहे. मऱ्हेगाव येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीतील मोटारीमध्ये बिघाड झाला होता. तो बिघाड दुरुस्त करण्यासाठी त्यांनी पालांदूर येथील छगन गोटेफोडे यांना बोलविले होते. पहाटे ६ वाजताच्या सुमारास छगन हे विहिरीत उतरुन मोटार दुरुस्तीचे काम करीत होते. दरम्यान, विहिरीतील विषारी वायुमुळे त्यांचा गुदमरुन विहिरीतच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लाखनीचे तहसीलदार धनंजय देशमुख, पालांदूरचे ठाणेदार बन्सोड, भंडारा अग्निशमन विभागाचे समीर गणवीर यांच्या नेतृत्वात रवी, अमित, विलास, प्रणय यांनी बचाव कार्यात सहभाग घेऊन मृतक छगन डोकीफोडे यांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. याप्रकरणी पालांदूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.