

भंडारा : पवनी तालुक्यातील मौजा वडेगांव, पवनी - भंडारा मुख्य रस्त्याला लागून असलेल्या शेतजमिनीचा व्यावसायिक वापर करण्याकरिता शेतमालकाने मुरूम, माती चे भरण भरल्यामुळे व संततधार होणाऱ्या पावसामुळे तीनशे एकराचे वर शेती संपूर्ण पाण्याखाली राहिली आहे. काहींची धानाची झालेली रोवणी तर काहींचे धानाचे परे पुर्णतः बुडून असल्यामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतात भरलेले पाणी निघण्याकरिता प्रशासनाने योग्य ती उपाय योजना करावी या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदार पवनी यांना दिले आहे.
गट न 133/2 या शेतजमिनीचे मालक निकेश रामलाल लांजेवार यांनी मालकीचे शेत अकृषक करून त्या शेतात व्यावसायिक वापर करण्याचे दृष्टीने माती व मुरूम टाकून 10 फूट उंच भरण भरले आहे. मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे शेतशिवार पावसाच्या पाण्याने तुडूंब भरले असून शेतातील पाणी निघण्याकरिता असलेले नैसर्गिक मार्ग अपुरे पडत आहे. त्यातच गट न 133/2 चे शेतकऱ्याने शेतात भरण भरून पाण्याचा मार्ग अडविल्यामुळे परिसरातील संपूर्ण शेती पाण्याखाली येऊन परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे.
शेतातील पाणी अगदी बाहेर निघण्याच्या मार्गावर भरण टाकला गेल्याने पाण्याचा बाहेर पडण्यास मार्ग न मिळाल्याने परिसरातील शेतात पाणी थांबले. संबंधित शेतकऱ्यास सांगितले असता तुमचे धानाची परे बुडालेत तर मी काय करू, तुम्ही तहसीलदार यांना निवेदन दिले तर तेच पाहतील असे उर्मट उत्तरे देऊन शेतकऱ्यांची कोणतीही कीव न करता उद्धटपणे तुम्हाला काय करायचे ते करा असे उत्तरे देत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतात तुडुंब भरले असलेले पाणी काढण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी व आमची शेती वाचवावी अशी आर्त हाक देत परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार पवनी यांचे सोबतच जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले असून गट न 133/2 ची शेती खरंच अकृषक करण्यात आली की काय, यामध्ये भरलेले मुरूम, मातीचे उत्खनन शासकीय परवानगीने झाले किंवा कसे याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
निवेदन देते वेळी विलास बावनकर, लंकेश बावनकर, संजय बावनकर, दुधराम बावनकर, संदीप मुंडले, सतीश ठवरे, ओंकारेश्वर मदनकर, जितेंद्र दहिकर यांचेसह अन्य शेतकरी उपस्थित होते.