

भंडारा- शहरातील बाबा मस्तानशाह वॉर्डातील बाल उत्सव शारदा मंडळात रविवारी (दि. १२) दुपारी महाप्रसादाच्या तयारीदरम्यान मोठा अपघात घडला. गरम कुकरचा दाब अचानक सुटल्याने वाफ आणि उकळते अन्न आसपास उडाल्यामुळे १४ जण भाजले असून त्यापैकी काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाल उत्सव शारदा मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वरणासाठी लावलेल्या सुमारे ४० लिटर क्षमतेच्या मोठ्या कुकरचा दाब जास्त झाल्याने झाकण उघडताच स्फोट झाला. अचानक उकळते पदार्थ आणि तीव्र वाफ अंगावर आल्याने १४ जण भाजले. जखमींमध्ये परवेज शेख, आशीष गणवीर, भावेश खंगार, रितेश साठवणे, विक्की गणवीर, साधना गणवीर, गीता आंबुलकर, ज्योती नान्हे, माया मारवाडे, शिव मारवाडे आणि सविता साठवणे यांचा समावेश आहे.
अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात हलवले. रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की सर्वांची प्रकृती स्थिर असून आवश्यक उपचार सुरू आहेत. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे