

भंडारा: पूर्व विदर्भात एकमेव सुस्थितीत सुरू असलेला भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघ सध्या आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहे. सर्वत्र खासगी दूध संघाचे वाढलेले जाळे, दूध उत्पादक शेतकºयांचा त्यांच्याकडे असलेला ओढ्यामुळे जिल्हा दूध संघाकडे दूधाची आवक घटली आहे. त्यामुळे संघाला शेतकऱ्यांनी अधिकाधिक दूध पुरविण्याचे आवाहन केले जात आहे.
भंडारा जिल्हा दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन यशाची शिखरे गाठली आहे. उत्कृष्ट संघ म्हणून भंडारा दूध संघाला गौरविण्यातही आले आहे. एकेकाळी या संघाचा दूध पुरवठा लाख लिटरच्या वर गेला होता. कालांतराने खासगी दूध संस्थांचे पेव फुटले. त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना भूरळ पाडून आपल्याकडे ओढले. परिणामी, भंडारा दूध संघाकडे येणारे दूध खासगी संस्थांकडे वळले. सध्यास्थितीत भंडारा संघाला साधारणत: ३० हजार लिटरचा पुरवठा होत आहे.
पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमधील दूध संघ बंद पडले असताना भंडारा जिल्हा दूध संघ टिकून आहे. परंतु, आता दूधाचा पुरवठा कमी आणि खर्च वाढत आहे. भंडारा संघाचा प्रतिमहिना खर्च ६० ते ७० लाख रुपये आहे. संघाला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासनाने वेळीच संघाला मदत करावी तसेच दूध उत्पादक शेतकºयांनी भंडारा संघाला अधिकाधिक दूध पुरवावा, असे आवाहन भंडारा दूध संघाकडून केले जात आहे.