

भंडारा: भंडारा नगर परिषदेत गेल्या ४ वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी होणार केली जावी. या आमदार परिणय फुके यांच्या मागणीमुळे अनेकांना हादरे बसले आहेत. या भ्रष्टाचारात कोण कोण सामील आहेत, हे या चौकशीतून उघड होणार असल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून आ. परिणय फुके मानले जातात. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांचे मोठे राजकीय वजन आहे. दोन दिवसांपूर्वी भंडारा भाजप कार्यकर्ता दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. परिणय फुके यांनी भंडारा नगर परिषदेतील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. भंडारा नगर परिषदेत कोणतेही काम २० ते ३० टक्के कट दिल्याशिवाय होत नाही, असे त्यांनी जाहिरपणे सांगत अशा भ्रष्टाचाराची चौकशी होणार असल्याचे सांगितले. भ्रष्टाचाºयांना पाठीशी घालणार नसल्याचीही त्यांनी तंबी दिली. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे संबंधितांमध्ये धडकी भरली आहे.
वास्तविक, भंडारा नगर परिषदेत गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामांच्या नावावर कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी करण्यात आली. परंतु, शहराची अवस्था होती त्यापेक्षा अधिक बकाल झाली आहे. मग हा निधी गेला कुठे? हा भ्रष्टाचार उघडपणे समाजमाध्यमांवर मांडण्यात आला. परंतु, लोकप्रतिनिधी आणि अधिकऱ्यांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता थेट मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेले आ. परिणय फुके यांनी या भ्रष्टाचाराला वाचा फोडल्याने याच मुद्दयाची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. २० ते ३० टक्के कट घेणारे कोण, याचीही चर्चा चवीनी रंगविली जात आहे. आता या भ्रष्टाचाराची चौकशी न्यायसंगतरित्या करुन दोषींची नावे उघड व्हावीत, एवढीच अपेक्षा शहरातील सामान्य जनतेतून होत आहे.