

भंडारा : लाखनी तालुक्यातील केसलवाडा/वाघ येथे रविवारी (ता. १९ ऑक्टोबर) सकाळी ९:३० वाजता विजेचा धक्का बसून ५४ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना घरातील स्वयंपाक खोलीत भिंतीचे सारवण करत असताना घडली. मृत महिलेचे नाव शांताबाई दामोधर चन्ने (वय ५४, रा. केसलवाडा/वाघ, ता. लाखनी) असे आहे.
सध्या दिवाळीचा सण सुरु असल्याने घरात साफसफाई आणि रंगरंगोटी, सारवणाचे काम सुरू होते. शांताबाई चन्ने या स्वयंपाक खोलीतील भिंत सारवत असताना घरातील दोषी इलेक्ट्रिक फिटिंगमुळे त्यांना विजेचा तीव्र झटका बसला. त्या जागेवरच कोसळल्या. घरच्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे हलवले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी दिलीप शेंडे यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे आणि पोलिस शिपाई शुभम लंजे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्यानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत शांताबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लाखनी पोलिस ठाण्याचे हवालदार गभने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत या घटनेचा तपास करीत आहेत. ही घटना गावात हळहळ व्यक्त होत आहे.