Bhandara Murder | पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर तरुणाची हत्या

चार अल्पवयीन आरोपी ताब्यात, शहरातील जलाराम चौकातील घटना
Bhandara Murder
Bhandara MurderFile Photo
Published on
Updated on

भंडारा: भंडारा पोलिस ठाण्याच्या ३०० मीटर अंतरावर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. यामागे जुने वैमनस्य कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे ११:३० वाजता शहरातील जलराम चौकातील युनियन बँकेसमोर घडली. पोलिसांनी काही तासांतच चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.


कार्तिक विलास भंडारी (२८), रा. संताजी वॉर्ड, भंडारा, असे मृत तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार, एप्रिल महिन्यात कार्तिकचा शास्त्री चौकात काही तरुणांशी वाद झाला होता. त्यानंतर त्याने भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपी अल्पवयीन मुलांनी कार्तिकला गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली. मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या चार अल्पवयीन मुलांनी शुक्रवारी रात्री ११.३० वाजता शहरातील जलाराम चौकातील युनियन बँकेसमोर कार्तिकवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला.


सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. त्यांच्यावर कलम १०३ (१), १८९ (४), १९०, १९१ (२) आणि १९१ (३) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी ही कारवाई केली. भंडारा पोलिस ठाण्याच्या अगदी लागून असलेल्या रस्त्यावर अल्पवयीन आरोपींनी ही हत्या केली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news