

Bhandara Municipal Council Election
भंडारा : नगर परिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. मित्रपक्षांकडूनच चुकीचा प्रचार केला गेला. तरीही मतदारांनी दिलेल्या कौलचा आम्ही आदर करतो. पण, भंडारा विधानसभेच्या विकासासाठी कोट्यवधींचे विविध प्रकल्प आणण्यासाठी बरेच कष्ट घेतले. नव्याने निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते प्रकल्प मार्गी लावावे, अशी भावना आ. नरेंद्र भोंडेकर यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली.
जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेला अपयश आले. भंडारा येथे आ.भोंडेकर यांच्या पत्नी या स्वत: पराभूत झाल्या. निवडणुका आटोपल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज आ. भोंडेकर माध्यमांसमोर बोलत होते.
आ. भोंडेकर म्हणाले, भंडारा विधानसभेत तीन हजार कोटींच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. परंतु, प्रत्यक्षात निधी मंजूर झाला असला तरी त्यापैकी २० ते ३० टक्केच काम झाले आहे. तीन हजार कोटी अद्यापही प्राप्त झाले नाहीत. परंतु, निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा चुकीचा प्रचार करण्यात आला. जलपर्यटन प्रकल्पाच्या बाबतीतही चुकीचा भ्रम पसरविण्यात आला. जलपर्यटनासाठी जलसंपदा विभागाची एनओसी नव्हती, पण ती घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती. जलपर्यटनासाठी जलसंपदा विभागाकडून कमी निधी मिळाल्याने प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी नगरविकास विभागाचा निधी वळविण्यात आला. यात काही गैर नव्हते. परंतु, भाजपने याला प्रचाराचा मुद्दा बनविल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली. आता निवडणुका आटोपल्या असून मतदारांनी दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे. निवडून आलेल्या सत्ताधाºयांना आम्ही नेहमीच मदत करु. त्यांनी तयार केलेला विकासाचा व्हिजन पूर्ण करावा. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही या मतदारसंघासाठी आणलेले विविध प्रकल्प पूर्णत्वास न्यावे, असे त्यांनी नमूद केले.