Bhandara Accident | एसटीच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू; महिला गंभीर जखमी  

मोहाडी-तुमसर राज्य मार्गावर दुर्दैवी अपघात,
Highway  Accident
Highway Accident Pudhari
Published on
Updated on

Mohadi Tumsar Highway Accident

भंडारा : आपल्या मामीला दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा एसटी बसच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. १) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मोहाडी-तुमसर राज्य मार्गावर घडली. आकाश प्रकाश कटबर्ये ( वय २६, रा. हरदोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात त्याची मामी अनिता मनोज कुर्वे (वय ४०) गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे हरदोलीत शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आकाश हा आपल्या मामाच्या कौटुंबिक वादाची तक्रार नोंदवण्यासाठी मामी अनिता कुर्वे यांच्यासोबत मोहाडी पोलिस ठाण्यात आला होता. तक्रार प्रक्रिया पूर्ण करून दोघेही दुचाकीवरून (क्रमांक एम एच ३६ एझेड ०६२८) हरदोलीला परत जात होते. मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळून जात असताना, मागून आलेल्या एका अज्ञात भरधाव दुचाकीस्वाराने आकाशच्या दुचाकीला कट मारला.

Highway  Accident
Bhandara Accident: चपराळ पहाडीजवळ कार उलटून भीषण आग; संपूर्ण कार जळून खाक

यामुळे दुचाकीचे संतुलन बिघडून अनिता कुर्वे रस्त्याच्या एका बाजूला फेकल्या गेल्या, तर आकाश समोरून येणाऱ्या तुमसर-नागपूर मार्गावरील हिरकणी बसच्या (क्रमांक एम एच ०६ बी डब्ल्यू १४३) चाकाखाली आला.

अपघाताची माहिती मिळताच जवळून जात असलेले पोलिस जीपचे चालक पृथ्वीराज राठोड यांनी तातडीने तेथील नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती आकाशला मृत घोषित केले. अनिता कुर्वे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Highway  Accident
Bhandara Accident | तुमसर-रामटेक मार्गावर भीषण अपघात; काटेबाम्हनीचे उपसरपंच ठार

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोहवा दुर्योधन भुरे, लांजेवार, कल्पना फड आणि ज्योत्सना बानासुरे यांनी जमाव नियंत्रित करून परिस्थिती हाताळली. मोहाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांत महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे नागरिक दहशतीत आहेत. या अपघाताचा पुढील तपास मोहाडी पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news