

भंडारा : लाखांदूर-वडसा मार्गावरील चपराळ पहाडीजवळ आज दुपारी एक भीषण अपघात घडला. चालत्या कारचा समोरील टायर अचानक फुटल्याने कार रस्त्यावरच उलटली आणि तिने तात्काळ पेट घेतला. या भीषण आगीत कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र, कारचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला. मंगेश मधुकर राऊत (वय ३३, रा. सोनी, ता. लाखांदूर) असे अपघातातून सुखरूप बचावलेल्या कारचालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज २९ मे रोजी दुपारी १:४५ वाजताच्या सुमारास मंगेश राऊत हे आपल्या मारुती सुझुकी अल्टो कारने लाखांदूरहून सोनी गावाकडे जात होते. चपराळ पहाडीजवळ अचानक त्यांच्या कारचा समोरील टायर फुटला. कारचा वेग जास्त असल्याने मंगेश यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यावरच पलटी झाली.
कार पलटी होताच अवघ्या काही सेकंदांतच इंजिनमधून मोठा धूर निघू लागला आणि अचानक आग भडकली. घटनेचे गांभीर्य ओळखून चालक मंगेश राऊत यांनी जराही वेळ न घालवता तातडीने कारमधून बाहेर पळ काढला. ते बाहेर पडताच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली.
रस्त्यावरील इतर वाहनधारकांनी या घटनेची माहिती तात्काळ प्रशासनाला दिली. यानंतर नगरपंचायत लाखांदूर येथील अग्निशामक दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून कारला लागलेली आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती. भरदिवसा घडलेल्या या थरारक अपघातामुळे लाखांदूर-वडसा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.