Bhandara Crime : अत्याचार करणाऱ्या आरोपीला ५ वर्षांचा सश्रम कारावास
Bhandara sexual assault case
भंडारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला ५ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश भारती काळे यांनी ठोठावली. दीपक कुसोबा हलमारे, (वय ३०, रा. सेलोटी ता. लाखनी) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने दि. १५ एप्रिल २०२२ रोजी ९ वर्षीय अल्पवयीन मुलीला बाथरुमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणाची तक्रार पोलिस स्टेशन लाखनी येथे करण्यात आली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गौरी ऊईके यांनी तपास करुन आरोपीविरुध्द पुरावा प्राप्त करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी योग्य बाजू मांडून महत्वाचे साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षवरुन आणि ठोस पुराव्याच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश भारती काळे यांनी दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी कलम-१० पोक्सो या कायद्यांतर्गत ५ वर्षाची शिक्षा व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, कलम-१२ पोक्सो या कायदया अंतर्गत १ वर्षाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, कलम-३५४(ए) कायद्यानुसार १ वर्षाची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांचे मार्गदर्शनात पोलिस नायक प्रमोद कमाने यांनी कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून कामकाज केले.

