

Leopard falls in well Lakhandoor
भंडारा: लाखांदूर तालुक्यातील खोलमारा- जुना येथे शनिवारी (दि.२२) सकाळी बिबट्या विहिरीत पडल्याची घटना समोर आली. पहाटे शिकारीच्या शोधात गावाकडे आलेल्या या बिबट्याला विहीर नजरेत न आल्याने तो थेट सुमारे चाळीस फूट खोल विहिरीत कोसळला.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन राबविले आणि अखेर तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षित बाहेर काढून कोका जंगलात सोडण्यात आले.
खोलमारा- जुना परिसरात गेल्या काही दिवसांपासून हा बिबट्या वावरत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. परिसरातील शेळ्या आणि कोंबड्यांवर त्याने हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या असून, घटनेच्या आदल्या दिवशी गावातील एका मोकाट कुत्र्याचीही त्याने शिकार केली होती.
शनिवारी सकाळी सुमारे सहा वाजता महेश डोये हे शेतकरी शेतावरील मोटरपंप सुरू करण्यासाठी गेले असता विहिरीत बिबट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ वनविभाग आणि पोलिसांना कळविल्यानंतर बचावकार्य सुरू झाले.
वनविभागाच्या पथकाने दोरी, पिंजरा आणि सुरक्षा व्यवस्थेचा वापर करून बिबट्याची सुरक्षित सुटका केली. जवळपास तीन तास चाललेल्या या कारवाईनंतर बिबट्याला जंगलात सोडण्यात आले.