

भंडारा: साकोलीजवळील सेंदूरवाफा येथील शेतशिवारात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७ महिन्याच्या अर्भकाला शेतशिवारात फेकून दिले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात साकोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
सेंदूरवाफा येथील शेतकरी महेश कापगते यांच्या शेतात सहा ते सात महिन्याचा अर्भक मृतावस्थेत असल्याच्या माहितीवरुन साकोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका अज्ञात महिलेने तिच्या पोटी जन्माला आलेल्या नवजात बाळाचा जन्म लपविण्यासाठी त्या बाळाला तिने शेतात फेकून दिल्याचे समोर आले.
ज्यावेळी त्याला शेतात फेकले तेव्हा तो बाळ जिवंत होते की मृत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी शेतमालक महेश कापगते यांच्या तक्रारीवरुन साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास महिला पोलिस हवालदार सारीका भूरे करीत आहेत. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.