

भंडारा: जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल सादर केला असून त्यात अवकाळी पावसामुळे ४१३.८० हेक्टरमधील उन्हाळी धान पिक आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. यात ९४२ शेतकरी बाधीत झाले आहेत. हा प्राथमिक अहवाल असून प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाअंती नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. ऐन उन्हाळाच्या दिवसात पावसाच्या आगमनाने होत्याचे नव्हते केले. उन्हाळी धान कापणीला आले असताना अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान केले. काही शेतकऱ्यांचे धान शेतात उभे असल्यामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. पावसामुळे ओले झालेले धान वाळविण्यासाठी जागा नसल्याने ते धान रस्त्यावर, गल्लोगल्लीत वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. सकाळी प्रखर उनं आणि संध्याकाळी सोसाट्याच्या वार्यासह अवकाळी पाऊस अशा स्थितीत शेतकरी सापडला होता. सकाळी वाळू घातलेले धान संध्याकाळ होताच पावसाच्या शक्यतेने पुन्हा जमा करण्याचे संकट शेतकऱ्यांवर आले.
जिल्हा प्रशासनाने २६ मे ते ३० मे या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात ७१ हजार ९२१ हेक्टरमध्ये उन्हाळी धान आणि भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली होती. अवकाळी पावसामुळे ४१३.८० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधीत शेतकर्यांची संख्या ९४२ आहे.
सर्वाधिक नुकसान लाखांदूर तालुक्यात झाले असून मोहाडी आणि तुमसर तालुक्यात निरंक नुकसान झाल्याचे हा अंदाज सांगतो. तथापि, सदरील नुकसान हे अंदाजित असून प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाअंती नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे.