

Vidarbha Water Crisis Solved
भंडारा: अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळाची स्थिती असून पाण्याच्या नियोजनावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गोसेखुर्द धरणात पाण्याचा साठा करण्यात येत आहे. मंगळवारी, गोसेखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरले असून २४५.५० मीटरवर पाणी साठविण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणाची पाणी साठविण्याची ही अंतिम पातळी आहे.
यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळे राज्य शासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहिर केला आहे. सोबतच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाºयाचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर्षीचा पावसाचा हंगाम संपल्याने पुढील पाऊस जून २०२७ मध्ये पडेल. तोपर्यंत पिण्याचे पाणी, शेतीसाठी लागणारे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याची गरज भागविण्यासाठी राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्दमध्ये पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे बंद करण्यात आली होती. पाण्याची पातळी हळूहळू वाढत गेल्याने धरणाला लागून असलेल्या क्षेत्रात पाणी वाढू लागले.
मंगळवारी गोसेखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. गोसेखुर्द धरणाची अंतिम पाणीपातळी २४५.५० मीटर असून ही पातळी गाठण्यात आली. त्यामुळे धरणालगत असलेल्या काही गावांच्या वेशीवर बॅकवॉटर पोहोचले आहे. पावसाने पाठ फिरविली तरी गोसेखुर्द धरणातील उपलब्ध पाण्यामुळे भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची पाण्याची चिंता तेवढी मिटली आहे.
गोसेखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाण्याचे पुढील नियोजन करण्याबाबत लवकरच गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाºयांसोबतच बैठक होणार आहे. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन-सिंचन-पिण्याच्या पाण्याचे नियोजन या त्रिसुत्रीवर भर दिला जाणार आहे. धरणाने अंतिम पाणीपातळी गाठल्यानंतर बॅकवॉटरमुळे पुराचा धोका टाळण्यासाठी वाढलेल्या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. मात्र २४५.५० मीटर ही पाणीपातळी कायम ठेवली जाणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी दिली.
गोसेखुर्द धरणात पूर्ण क्षमतेने जलसाठा निर्माण व्हावा, यासाठी सन २०२२ मध्ये या प्रकल्पाची अंमित पाण्याची पातळी गाठण्यात आली होती. जलसाठा पूर्ण झाल्यानंतर किती भूभाग पाण्याखाली येईल, याचा अंदाज बांधण्यासाठी हा प्रयोग झाला होता. पाणीपातळीत वाढ झाल्याने वैनगंगेच्या खोºयासह भंडारा शहरालगत असलेल्या वस्त्या, गावे, स्मशानभूमी पाण्याखाली आले होते. आता हा धोका टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.