पुढारी ऑनलाईन डेस्क : गोरेगावमध्ये पत्नीचा खून करून नवऱ्याने जीवन संपवले होते. शुक्रवारी घडलेल्या घटनेमागील कारण आता पुढे आलेले आहे. या घटनेतील नवऱ्याची नोकरी कोव्हिड काळात गेली होती, त्यानंतर तो नैराश्यात होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. (Goregaon Murder Case)
गोरेगाव पश्चिम येथील टोपीवाला सीएचएसमध्ये शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला होता. मृत पतीचे नाव किशोर पेडणेकर (५८) आणि पत्नीचे नाव राजश्री (५६) असे आहे. शुक्रवारी सकाळी किशोर यांनी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. हा प्रकार कळताच अपार्टमेंटमधील वॉचमनने पोलिसांना बोलवले. किशोर राहत असलेला फ्लॅट बाहेरून बंद असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर राजश्री यांचा खून झाल्याचे दिसून आले.
किशोर जीमसाठी लागणाऱ्या मशिनरी बनवणाऱ्या एका कंपनीत काम सेल्समन म्हणून काम करत होते. पण कोव्हिडच्या साथीत त्यांना नोकरी गमवावी लागली. त्यातून त्यांना नैराश्येचा सामना करावा लागत होता, आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
किशोर यांनी शुक्रवारी मृत्यू पूर्वी त्यांचे बँक खाते, मालमत्ता यांची माहिती एका जवळच्या नातवाईकाला पाठवली होती, असे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.