Bhandara Fraud : दाभा येथील पेट्रोलपंपाच्या गल्ल्यावर मॅनेजरचाच डल्ला; मालकाला तब्बल ३५ लाखांचा गंडा

ऑनलाइन हिशोबात फेरफार, डिझेलच्या खोट्या नोंदी
Bhandara Fraud : दाभा येथील पेट्रोलपंपाच्या गल्ल्यावर मॅनेजरचाच डल्ला; मालकाला तब्बल ३५ लाखांचा गंडा
Published on
Updated on

भंडारा : दाभा येथील रिलायन्स जिओ पेट्रोलपंपावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर झाल्याचे उघडकीस आले आहे. पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाने हिशोबात फेरफार करून पंपमालकाला तब्बल ३५ लाख १२ हजार ८४८ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी वरठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विनोद भाऊराव तुमसरे (वय ३८, रा. सालई) यांनी २०२३ मध्ये दाभा परिसरात रिलायन्स जिओचा पेट्रोलपंप सुरू केला होता. सुरुवातीपासूनच पांजरा (बोरी) येथील प्रशांत सुरेश रामटेके (वय ३७) हा तिथे व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून कार्यरत होता. पेट्रोलपंपावर दर २४ तासांत होणारी पेट्रोल-डिझेलची रोख विक्री, फोनपे, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन पेमेंट तसेच आरबीएमएल (RBML) कंपनीच्या ट्रान्सकनेक्ट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांचा हिशोब कर्मचारी पाळीनुसार (शिफ्टनुसार) व्यवस्थापक प्रशांतकडे सुपूर्द करत असत. त्यानंतर आरोपी हा सर्व हिशोबासह रोख रक्कम मालक विनोद तुमसरे यांच्याकडे जमा करत असे.

आरबीएमएल कंपनीने ट्रान्सकनेक्ट खात्याची संपूर्ण यंत्रणा पेट्रोलपंप कार्यालयाच्या संगणकावर बसवली होती. कंपनीकडून पैशांच्या देवाणघेवाणीसंबंधी येणारे ई-मेल आणि संदेश आरोपी व्यवस्थापक स्वतःच पाहत असे आणि कोणालाही याची कुणकुण लागू नये म्हणून ते तात्काळ नष्ट (डिलीट) करत असे. मालकाने नियुक्त केलेले खासगी ऑडिटर्स दर १ ते २ महिन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या एकूण विक्रीचे ऑडिट करत असत; परंतु ते आरबीएमएल कंपनीच्या ट्रान्सकनेक्ट खात्यावरील व्यवहारांचे ऑडिट करत नव्हते.

आरोपी व्यवस्थापकाने याच गोष्टीचा गैरफायदा घेतला. त्याने ट्रान्सकनेक्ट खात्यात डिझेलची खोटी विक्री जास्त दाखवून, प्रत्यक्ष पेट्रोल-डिझेलच्या रोख विक्रीतून मिळालेल्या पैशांमधून ३५ लाख १२ हजार ८४८ रुपयांचा अपहार केला. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर विनोद तुमसरे यांच्या तक्रारीवरून वरठी पोलिसांनी आरोपी व्यवस्थापक प्रशांत रामटेकेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news