

Bhandara MCOCA case
भंडारा : भंडारा शहरातील मुस्लीम लायब्ररी चौकाजवळ ९ आॅगस्ट रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील चार आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
साहिल शाकीर शेख (२३), त्याचा भाऊ फैजान शाकीर शेख (२५) रा. बाबा मस्तानशहा वॉर्ड भंडारा, प्रितम विलास मेश्राम (३३) रा. नांदोरा आणि आयुष मुन्ना दहिवले (१९) रा. पेट्रोलपंप ठाणा अशी आरोपींची नावे आहेत. यातील साहिल शाकीर शेख हा टोळीप्रमुख असून बैरागी वाडा टोळी म्हणून तो कुख्यात होता.
साहिल शाकीर शेख आणि फैजान शाकीर शेख यांनी आपल्या टोळीचे सर्वस्व कायम ठेवण्यासाठी वसीम उर्फ टिंकू खान रा. सौदागर मोहल्ला याच्यासोबत नेहमी वाद होत असे. त्याचाच वचपा काढण्यासाठी ९ आॅगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास साहिल शेख, फैजान शेख, प्रितम मेश्राम आणि आयुष दहिवले यांनी मिळून वसीम उर्फ टिंकू खान याचा खून केला. मध्यस्थीसाठी धावून आलेला टिंकूचा मित्र शशांक गजभिये याचाही आरोपींनी खून केला. या दुहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ माजली होती.
साहिल आणि फैजान शेख यांच्यावर भंडारा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण, खंडणीची मागणी, शासकीय कामात अडथळा, शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला आदी गुन्ह दाखल आहेत. शहरात टोळीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हत्यार घेऊन फिरणे आदी गुन्ह्यात अटक करुन कारवाई करुनही त्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. उलट कारागृहातून जामीनावर सुटताच नवीन सदस्य मिळून टोळी तयार करीत होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी चारही आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्तव विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठविला. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशाने चारही आरोपींवर मोक्का कायद्याचे कलम वाढ करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, भंडाराचे ठाणेदार उल्हास भुसारी व त्यांच्या पथकाने केली.