

भंडारा : नगरपरिषद क्षेत्र अंतर्गत एकूण १६४०० घरांचे सर्व्हे करण्यात येणार असून या हा सर्व्हे तब्बल ११२ वर्षानंतर करण्यात येणार आहे. यासाठी नगर परिषद भंडाराद्वारे तात्काळ एक कोटी रुपये भरून सर्व्हे सुरु करण्याचे निर्देश आज आमदार नरेंद्रे भोंडेकर यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.
भंडारा नगर परिषदेच्या क्षेत्रांतर्गत १९१२ साली सर्व्हे करण्यात आला होता. इंग्रज काळात झालेल्या सर्व्हेनंतर पुन्हा सर्व्हे न झाल्यामुळे नगर परिषद क्षेत्रांतर्गत १६४०० कुटुंब नगर परिषदेच्या हद्दीबाहेरच आहेत. त्यामुळे आजही हे निवासी अतिक्रमणधारक म्हणविले जात आहे.
आ. नरेंद्र भोंडेकर यांच्याद्वारे सोमवारी, विविध विषयांवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत या विषयावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. नगर परिषद मुख्याधिकारी यांनी माहिती देतांना सांगितले की, भंडारा नगर परिषद हद्दीतील पिंगलाई येथील ३२००, गणेशपूर ५०००, केसलवाडा १२०० व भंडारा खास येथील ७००० असे एकूण १६,४०० घरांचे सिटी सर्व्हे होऊ शकले नाही. त्याकरिता लागणारा निधी हा कमी पडत आहे.
अशात आ. नरेंद्र भोंडेकर यांनी या कामाकरिता लागणारे तीन कोटी ४० लक्षपैकी एक कोटी रुपये नगर परिषदेच्या निधीतून भरण्याचे निर्देश देत सिटी सर्व्हे तात्काळ सुरु करण्यास सांगितले. सोबतच उरलेले दोन कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी हा वैशिष्टपूर्ण योजनेतून भरण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. या सर्व्हेनंतर जे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून नझुलच्या जागेवर अतिक्रण करून होते, त्यांचा मार्ग मोकळा होऊन त्यांना त्या जागेचा मालिकांना हक्क मिळू शकेल. इतकेच नाही तर अनेक परिवारांना घरकुल योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे. या बैठकीला शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.