

भंडारा: दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या शस्त्रधारी टोळीला तुमसर पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई तुमसर शहरानजिकच्या शिवनी रेल्वे पुलाजवळ करण्यात आली. आरोपींकडून तलवार, दोरी, मिरची पावडर आदी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
मयुर उर्फ गप्पूर विक्रांत सांडेकर (२३), अजय काल्या उर्फ कार्तिक कैलाश राऊत (२५), गौरीशंकर उर्फ रितीक प्रकाश चाचेरे (२४), टॉनी राऊत (२२), सागर धुर्वे (२१) सर्व रा. तुमसर अशी आरोपींची नावे आहेत.
तुमसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण सयाम यांना काही दरोडेखोर दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. यावरुन त्यांनी पथकासह शिवनी पुलाकडे कूच केली. त्याठिकाणी सर्व आरोपी शस्त्रासह मिळून आले. पोलिसांनी त्यांना घरोव घालून ताब्यात घेतले.
आरोपींकडे तलवार, ब्लेड, लाठी, घातक शस्त्र, मिरची पावडर, दोरखंड, टॉर्च आदी साहित्य मिळून आले. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाशकुमार साखरे करीत आहेत.