

Two more arrested in robbery case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
बजाजनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यात दरोडाप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.११) नांदेड येथून आणखी दोघांना अटक केली. एन्काउंटरमध्ये मारला गेलेला दरोडेखोर अमोल खोतकरचा मित्र रूपेश सुभाष पत्रे (२५) आणि सराफा व्यावसायिक वैभव श्रीपाद मैड (२३, दोघेही रा. नांदेड) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
आतापर्यंत पोलिसांनी २६ दिवसांत साडेपाच किलो सोन्यापैकी केवळ ६० तोळे सोने, ३२ किलो चांदीपैकी ३० किलो चांदी, ८ लाखांची रोकड, दोन कार, मोपेड जप्त केली आहे. गुन्ह्यात १९ आरोपींना अटक झाली आहे. उर्वरित सोने शोधताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. मात्र सोने कुठे आहे हे लवकरच समोर येईल, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. अधिक माहितीनुसार, बजाजनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा पडल्यानंतर मुख्य दरोडेखोर अमोल खोतकर याचे गुन्हे शाखेचे एपीआय रविकांत गच्चे यांनी २६ मे रोजी एन्काउंटर केले.
त्यानंतर दरोडाप्रकरणी १४ दिवसांपासून अटकेत अस-लेले आरोपी सुरेश रामकिशन गंगणे, योगेश सुभाष हाजवे, सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबीरोद्दीन, सोहेल जलील शेख आणि महेंद्र माधवराव बिडवे या आरोपींची मंगळवारी न्यायालयाने हसूल कारागृहात रवानगी केली.
अंबाजोगाई येथून रविवारी (दि.८) रात्री अटक करण्यात आलेला आरोपी सूर्यकांत ऊर्फ सुरेश श्रीराम मुळे याच्याकडून चारचाकी जप्त करण्यात आली. आरोपी मुळेने चोरीतील सोने विकून पुणे येथून साडेसहा लाखांत सेकंड हॅन्ड कार विकत घेतली होती. पोलिसांनी सोमवारी पडेगाव येथून एका गैरेजसमोर उभ्या असलेल्या कार (एमएच-४३-एएफ ३२४६) मधून दरोड्यातील ३२ किलो ४०० ग्रॅम चांदीची भांडी जप्त केली. या कारची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात विदेशी नोटा व भारतीय चलनातून बाद झालेल्या एक हज-ाराच्या काही नोटा आढळून आल्या. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या. त्यानंतर आता नांदेड येथून आणखी दोघांना अटक करण्यात आली.
अमोल खोतकर दरोडा टाकल्यानंतर दागिने घेऊन नांदेड येथे गेला होता. तसेच त्याच्यासोबत दरोडेखोर सुरेश गंगणेही होता. दोघांनी मध्यस्थ आणि मित्रांच्या मदतीने सर्व सोन्याची विल्हेवाट नांदेड येथेच लावल्याचा अंदाज आहे. यापूर्वी गुन्हे शाखेने नांदेडचा सराफा व्यावसायिक आशिष बाकलीवाल याला अटक केली होती. त्यानंतर आता दुसरा सराफा व्यावसायिक वैभव मैड यालाही नांदेडहून अटक झाल्याने नांदेड पोलिसांच्या रडारवर आले आहे. यात आरोपींची संख्या आणखी वाढू शकते.
एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेला दरोडेखोर अमोल खोतकर सोबत कारमध्ये फिरलेली त्याची बंगाली मैत्रीण खुशीची सीआयडीने गेल्या काही दिवसांपासून कसून चौकशी केली. त्यानंतर आता तिची गुन्हे शाखेत गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. खोतकरकडे असलेले साडेपाच किलो सोने कुठे, कोणाला दिले याची माहिती तिच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरोडा पडल्यानंतर एनकाऊंटरपर्यंत खुशी खोतकरसोबतच फिरत होती. त्यामुळे तिच्याकडून काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आरोपी रूपेश पत्रे हा एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेला दरोडेखोर अमोल खोतकरचा मित्र आहे. पूर्वी तो अमोलकडे हॉटेलमध्ये कामाला होता. त्यानंतर त्याने नांदेड येथे भाड्याने वाहन चालवू लागला. अमोलने दरोड्यातील सोने-चांदी नांदेड येथे गेल्यानंतर रूपेशकडे विक्रीसाठी दिले होते. रूपेशने दागिने आरोपी सराफा व्यावसायिक वैभव मैड यांच्याकडे विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. पीएसआय संदीप शिंदे, अंमलदार गावंडे, खांडेकर, मुठे, चौरे यांच्या पथकाने नांदेड येथून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून अद्याप मुद्देमाल हस्तगत झालेला नाही. त्यामुळे खोतकरने किती सोने-चांदी रूपेशकडे दिली हे अद्याप समोर आलेले नाही.