

भंडारा : भंडारा जिल्हा कारागृहात नातेवाईकांना फोन करण्यावरून दोन कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या भांडणात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याचे नाक फोडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेने कारागृहात मोठी खळबळ उडाली.
बंदीवानांना कारागृहातून नातेवाईकांशी बोलण्यासाठी फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार बॅरेक क्र.६ जवळ काही कैद्यांना फोनसाठी आणण्यात आले होते. यावेळी हद्दपार कैदी सम्येत उर्फ पोंग्या संतोष दाभणे (रा. सुभाषनगर, नागपूर) याने ‘मला आधी फोन करायचा आहे, तू बाजूला हो’, असे सांगत न्यायबंदी दिनेश अग्रवाल याच्याशी वाद घातला.
वादाचे रुपांतर लगेचच हाणामारीत झाले. पोंग्याने दिनेशच्या नाकावर जबर वार केला. यात दिनेशला गंभीर दुखापत झाली व नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. तात्काळ कारागृहातील पोलिस कर्मचारी व इतर बंद्यांनी मध्यस्थी करून भांडण थांबविले. जखमी दिनेश अग्रवाल याला कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत आरोपी पोंग्या दाभणे याच्यावर भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वानखेडे करीत आहेत.