

Poor Road Construction on Mumbai Calcutta Highway
भंडारा: भंडारा शहरातील वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांचे जाणारे बळी यावर तोडगा काढण्यासाठी बांधण्यात आलेला बायपास मार्ग नागरिकांच्या जीवावर उठला आहे. संततधार पावसामुळे या रस्त्याच्या कडा वाहून गेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता बळावली आहे. या बांधकामाची चौकशीची मागणी होत आहे.
भंडारा शहरालगत मुंबई-कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ६५० कोटी रुपयांच्या खर्चातून १५ किलोमीटरच्या बायपासची निर्मिती करण्यात आली. या मार्गाचे अधिकृत लोकार्पण झाले नसले तरी ते वाहतूकसाठी खुले करण्यात आले. या मार्गाचे शिल्लक काम अजूनही सुरूच आहे.
मागील २४ तासांपासून भंडारा जिल्ह्यात आलेल्या जोरदार पावसात या बायपास महामार्गाच्या सुरक्षेकरिता निर्माण करण्यात आलेल्या कडा वाहून गेल्या. या सिमेंटच्या कडा वाहून गेल्यानं त्याखालील मातीही आता पाण्यासोबत बाहेर निघायला सुरुवात झाली. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची आणि चारचाकी वाहनांची भरधाव वाहतूक असते. उल्लेखनीय म्हणजे, सोमवारी रात्रीच्या सुमारास या महामार्गावर पाणी साचल्याने दुचाकी स्लीप होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला.
कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला या बायपास महामार्गावरील कडा उद्घाटनापूर्वीचं पावसामुळे घसरल्यात आणि महामार्गावर भरण केलेली मातीही हळूहळू निसरडू लागल्याने याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे दिसून येत आहे. काल रस्त्याच्या कडा वाहून गेल्यानंतर दिवसभर त्यावर मलमपट्टी करण्याचे काम सुरू होते. मात्र यावर तात्पुरती लिपापोती करणे हा पर्याय नसून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता नागरिक करीत आहेत.
या मार्गाच्या बांधकामात झालेल्या अनेक तांत्रिक चुकांमुळे या मार्गाने जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बायपास रस्त्यावर अशोकनगर, फुलमोगरा, कोरंबी, कारधा, भिलेवाडा, पलाडी येथे पूल बांधण्यात आले. परंतु पलाडीकडे जाण्यासाठी एकही अंडरपास शिल्लक राहिलेला नाही, ज्यामुळे गावकऱ्यांना गावाकडे जाण्यासाठी दोन किलोमीटरचा लांब वळसा घालून जावे लागत आहे. यामुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. भिलेवाडा, कारधा, कोरंबी, अशोकनगर येथे झालेल्या ओव्हरब्रिजचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे ये-जा करण्यात मोठ्या अडचणी येतात.
पुलावर ठिकठिकानी पाणी साचत आहे. गोसीखुर्द आणि पर्यावरण विभागाच्या परवानगीशिवाय वैनगंगा नदीच्या काठावर ओव्हर ब्रिजचे काम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आले. पलाडी, कोका गावातील नागरिकांना सिंगोरी फाटा येथून एक किलोमीटर चालत जावे लागते. तर भंडारा येथे पोहोचण्यासाठी दोन किलोमीटर लागतात. ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी करूनही, राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांनी पलाडी क्रॉसिंगवर वारंवार होणाऱ्या अपघातांसाठी बायपासच्या निकृष्ट बांधकामाला जबाबदार धरले आणि पलाडी क्रॉसिंगवर लवकरात लवकर ओव्हरब्रिज बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.