

Lakhandoor Incident
भंडारा: तलवार हातात घेऊन फिरविणाऱ्या युवकाला समजविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तलवार दाखवून दमदाटी करून हल्ला केल्याची घटना लाखांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मंजुळा माता वसतीगृहाजवळील रस्त्यावर दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एक युवक हातात तलवारसदृश हत्यार घेऊन फिरत असल्याची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळाली. यावरुन पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता, आरोपी नितीन पुरूषोत्तम भुते (३४) रा. लाखांदूर प्लॉट हा हातात लोखंडी तलवार सदृश हत्यार घेऊन उभा होता.
पोलिसांनी स्वत:ची ओळख दिल्यानंतर आणि हत्यार सोडण्यास सांगितल्यावर नितीन भुते याने ‘मी पोलिसांना मोजत नाही’ असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्याने ‘मी खत्रीला जिवंत सोडणार नाही’ असे धमकीवजा उद्गार काढले आणि पोलिसांशी हुज्जत घालू लागला. पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिकार करत पोलिस अधिकाऱ्यांचा गळा पकडून त्यांच्या गणवेशाची लुप फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गद्रे करीत आहेत.