

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : वर्चस्वाच्या लढाईत रेती व मॅग्निज व्यावसायिक नईम शेख याचा गोबरवाही रेल्वे फाटकासमोर बंदुकीतून गोळ्या व धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ज्या दिवशी नईम शेख याचा खून करण्यात आला त्यादिवशी दिवसभर पाळत ठेवून असलेल्या आणि मुख्य सुत्रधाराला नईम शेखची संपूर्ण माहीती पुरविणाऱ्या सचिन भाऊराव भोयर (वय २८, रा. खापा, ता. तुमसर) याला गोबरवाही पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. (Naeem Shaikh murder case)
या अटकेमुळे आतापर्यंत दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. या खून प्रकरणात एकूण अकरा आरोपींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी मुख्य सुत्रधार संतोष डहाट याला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता सचिन भोयर याने खुनाच्या दिवशी कॉल केलेले दिसून आले. यावरून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खापा येथून शुक्रवारी अटक करण्यात आलेला दहावा आरोपी सचिन भोयर हा बजरंग दलाचा कार्यकर्ता म्हणून वावरत होता. त्याने नईम शेख याचे लोकेशन संतोष डहाट याला पुरविल्याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा