

Bhandara Accident 9 Deaths CCTV Video: भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपुर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव जवळ आज पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव बोलेरो वाहनाने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चिमुकल्यांसह महिला आणि इतर प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
जामबाई रामावतार वर्मा (५०)रा. एकता नगर, भांडेवाडी, नागपूर, मीनाक्षी राजकुमार वर्मा (२६) रा. बिचारपूर जि. लोहारा (छत्तीसगड), गायत्री रूपेश उईके (३०) रा. चिचोला, राजनांदगाव (छत्तीसगड), स्विटी रूपेश उईके (६) रा. चिचोला, राजनांदगाव (छत्तीसगड), धैर्य रूपेश उईके (४) रा. चिचोला, राजनांदगाव (छत्तीसगड), सरिता विजय वर्मा (३०) रा. बिचारपूर जि. लोहारा (छत्तीसगड), ग्रीशा राजकुमार वर्मा (२) रा. बिचारपूर जि. लोहारा (छत्तीसगड) आणि राजकुमारी प्रल्हाद पटेल (३५) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
सुभाष विजय वर्मा (५), गुलशन रमेश वर्मा (१८), ललिता योगेश पटेल (२६), तन्मय योगेश पटेल (३), गणेशिया अश्वंत पटेल (२२), रमय्या खोजलर पटेल (२१), रामप्यारी भारत पटेल (४५), मयंक योगेश पटेल (६), रितेश विजय वर्मा (३), मेघा राजकुमार वर्मा (३), लोकेश असवन पटेल (सुमारे ९), डॉली असवन पटेल (सुमारे ७) (छत्तीसगड) आणि रामकुमारी दुलारी पटेल (३०) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो वाहन भरधाव वेगाने जात होते. महामार्गालगत पेट्रोल पंपाजवळ ट्रक महामार्गाला जात असतानाच बोलेरोने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला आणि हा अपघात घडला.
या दुर्घटनेत तीन चिमुकल्यांसह महिलांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारादरम्यान एकाच मृत्यू झाल्याने मृत्यूचा आकडा 9 वर गेला आहे.
या भीषण अपघातापूर्वीची दृश्ये परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या दृश्यांमध्ये बोलेरो वाहन महामार्गावरून जाताना दिसत असून, त्यानंतर काही क्षणांतच भीषण अपघात घडल्याचे दिसून येतं. या CCTV फुटेजच्या आधारे अपघाताचा नेमका घटनाक्रम तपासला जात आहे.
बोलेरो वाहनाचा वेग अधिक असल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकला मागून धडक बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताच्या घटनेचा पुढील तपास संबंधित पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.