भंडाऱ्यात बंडखोरांना थोपविण्याचे आव्हान; उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी
भंडारा: पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबरपर्यंत नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत तिन्ही मतदारसंघात बंडखोरांची संख्या मोठी असल्याने पक्षीय उमेदवारांची अडचण वाढली आहे. बंडखोरीमुळे मतविभाजनाचा फटका बसू नये. यासाठी अशा बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यास सुरुवात झाली आहे.
भंडारा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या पूजा ठवकर यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नरेंद्र पहाडे यांनीही मोठे शक्तीप्रदर्शन करुन उमेदवारी दाखल केली. याशिवाय नितीन तुमाने, दिपक गजभिये, प्रेमसागर गणवीर, आशिष गोंडाणे, अरविंद भालाधरे, चेतक डोंगरे यांनीही पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली.
बंडखोरीचा उद्रेक तुमसर विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दिसून आला. माजी आमदार चरण वाघमारे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करुन महाविकास आघाडीची उमेदवारी पदरात पाडून घेतली. आणि शक्तीप्रदर्शन करुन नामांकनही दाखल केले. परंतु, त्यांना उमेदवारी मिळाल्याने महाविकास आघाडीतील नाराज झालेल्या गटाने बंडखोरी करत नामांकन दाखल केले. माजी आमदार अनिल बावनकर, ठाकचंद मुंगुसमारे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नामांकन दाखल केले. साकोलीचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी तुमसरातून उमेदवारी दाखल केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रातून महायुतीकडून भाजपने दावा केला असताना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अविनाश ब्राम्हणकर यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याने भाजपचा एक गट नाराज आहे. त्यामुळे भाजपचे डॉ. सोमदत्त करंजेकर, भाजपचे माजी आमदार बाळा काशिवार यांनी अपक्ष नामांकन दाखल केले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महायुतीचे अविनाश ब्राम्हणकर आणि अपक्ष अशा तिरंगी लढतीचे चित्र आहे.
तथापि, तिन्ही मतदारसंघात बंडखोरी निर्माण झाल्याने त्याचा फटका पक्षीय उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. मतविभाजनाची शक्यता असलेल्या बंडखोर उमेदवारांना शांत करण्यासाठी त्यांची मनधरणी करावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत किती उमेदवार अर्ज मागे घेतात, यावर पुढील राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे.