

भंडारा: दुचाकीने आलेल्या तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून फळविक्रेत्या महिलेच्या अंगावरील ४० हजारांचे दागिणे हिसकावून पळ काढला. ही घटना मानेगाव ते पालांदुर मार्गावरील पोहरा पुलाजवळ घडली. भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.
वंदना शंकर दिघोरे (४७) असे पीडित महिलेचे नाव आहे. पोहरा निवासी या महिलेचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. त्या सकाळी १० वाजेपासून मानेगाव ते पालांदूर मार्गावरील पोहरा पुलाजवळच्या रस्त्यालगत फळांचे दुकान लावतात. दुपारच्या वेळी तिघे जण चेहऱ्यावर रुमाल बांधून स्कुटीने तेथे पोहोचले. रस्त्यावर व आजुबाजूला कोणीही नसल्याची संधी साधून त्यांनी त्या महिलेच्या गळ्यावर चाकू लावला. तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तोडून व हिसकावून दमदाटी करीत तिघेही आरोपी स्कुटीने मानेगावच्या दिशेने पसार झाले. त्यानंतर महिलेने लाखनी पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची हकीकत पोलिसांनी सांगून तक्रार नोंदविली. लाखनी पोलिसांचे पथक महिलेला घेवून चोरांच्या मागावर रवाना झाले होते. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे चोरांचे धाडस वाढल्याचे दिसून येत असून त्यांना गजाआड करण्याचे आव्हान लाखनी पोलिसांसमोर आहे.