खड्ड्यांनी घेतला मुलीचा जीव; संतप्त नागरिकांनी भंडारा - तुमसर मार्ग रोखला

Bhandara News | वरठी येथील अपघातात ११ वर्षांची मुलगी ठार
Bhandara News
आंदोलनामुळे भंडारा ते तुमसर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.Pudhari Photo
Published on
Updated on

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : वरठी येथील सनफ्लॅग कंपनी गेट ते पाचगाव फाटा बायपास पुलावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. रेल्वे रुळाच्या अलीकडच्या भागात चढावावर खोल व लांब मोठा खड्डा आहे. गुरुवारी, खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा तोल सुटला व समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. यात एकलारी येथील ११ वर्षांच्या मुलीचा जीव गेला. वडील व तिचा वर्गमित्र गंभीर जखमी झाले. सहा महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये रोष असून बांधकाम विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी बायपास रस्त्यावर नागरिकांनी धरणे आंदोलन केले. शुक्रवारी झालेल्या या आंदोलनामुळे भंडारा ते तुमसर मार्गावरील वाहतूक ठप्प होती.

एकलारी येथील विजय सेलोकर (वय ५०) हे नेहमीप्रमाणे मुलांचे शिकवणी वर्ग आटोपून दुचाकीने परत जात होते. त्यांच्या सोबत मुलगी एकता व तिचा वर्गमित्र विराज कन्हैयालाल मारवाडे (वय ११) होते. बायपास पुलावर गाडी चढवताना समोरून अचानक वाहनांची वर्दळ आली. दरम्यान, पुलाच्या चढावावर असलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीचा तोल गेला. यामुळे समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार व त्यांच्यासोबत असलेली दोन्ही मुले निपचित पडली. काही वेळानंतर गावातील नागरिकांनी त्यांना उचलून रस्त्याच्या कडेला केले. दरम्यान पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. व जखमींना तत्काळ उपचारासाठी भंडारा येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. उपचारदरम्यान मुलीचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार विजय सेलोकर व विराज मारवाडे हे गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले.

रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीअभावी वर्दळीच्या रस्त्यावर अपघात वाढले आहेत. रस्त्याची डागडुगी करण्याची मागणी करूनही दुरुस्ती न झाल्याने संतप्त नागरिकांनी शुक्रवारी वरठी येथील पुलावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी जवळपास २ तास रस्ता अडवून मागण्याचे निवेदन तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना देण्यात आले. यावेळी वरठीचे पोलिस निरीक्षक निलेश गिरी व सायबर विभागाचे पोलिस निरीक्षक अभिजित पाटील ताफ्यासह घटनास्थळावर उपस्थित होते.

रस्ता रोको आंदोलनात सरपंच चांगदेव रघुते, उपसरपंच अनिता गजभिये, माजी सभापती रितेश वासनिक, माजी उपसरपंच मनोज सुखानी, सामाजिक कार्यकर्ते बाबुलाल बोन्द्रे, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, अश्विन शेंडे, अरविंद येळणे, मुकेश गोमाशे, विलास कुथे, थारणोद डाकरे, ग्राम पंचायत सदस्य सीमा डोंगरे, संगीता सुखानी, भाऊदास नंदागवळी, रवी बोरकर, आनंद गजभिये, तंटा मुक्त समिती अध्यक्ष चेतन डांगरे, आकाश काकडे, संदीप बोन्द्रे, अतुल चौधरी उपस्थित होते.

Bhandara News
भंडारा : आरोपी वकिलाचा जामीन नाकारला, एक दिवसाची कोठडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news