

Tumsar Mohadi 20 tippers sand seized
भंडारा: जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि तस्करी करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने नवीन वर्षातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या थेट आदेशावरून राबविलेल्या या मोहिमेत महसूल आणि पोलीस विभागाने २० रेती टिप्पर जप्त केले आहेत. कारवाई टाळण्यासाठी हे सर्व टिप्पर महायुतीच्या घटक पक्षातील एका मोठ्या नेत्याच्या राईस मिलच्या आवारात लपवून ठेवण्यात आले होते. या धडक कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तुमसर आणि मोहाडी परिसरातून मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. पथकांचा ससेमिरा चुकवण्यासाठी माफियांनी वाहने सुरक्षित स्थळी दडवल्याचा संशय होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी अंबादे आणि मोहाडीच्या तहसीलदारांनी वरठी येथील 'गुरुदेव राईस मिल' आणि मोहगाव येथील 'जय किसान राईस मिल'वर छापा टाकला. या कारवाईत १७ आणि ३ अशा एकूण २० टिप्परसह ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या ट्रकमध्ये आमदार बंधू आणि वरठी येथील एका रेती माफियाच्या मालकीच्या टिप्परचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नागपूरच्या दिशेने जाणारी ही वाहने नाकाबंदी टाळण्यासाठी राईस मिलच्या आवारात उभी केली होती. एका लोकप्रतिनिधीच्या व्यावसायिक प्रतिष्ठानात अशा प्रकारे अवैध रेतीचे टिप्पर आढळल्याने या प्रकरणाला आता विशेष गांभीर्य प्राप्त झाले असून यातून अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे सर्व टिप्पर सध्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता ही मोहीम राबविल्याने नागरिकांकडून कौतुक होत आहे. अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सध्या जप्त वाहनांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असून लवकरच संबंधित मालकांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे.