

भंडारा : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असतानाच, लाखांदूर तालुक्यात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. पिंपळगाव (कोहळी) येथे विनापरवाना आणि बोगस धान बियाण्यांची विक्री करणाऱ्या एका इसमावर धाड टाकून तब्बल २.५० लाख रुपये किमतीचा बियाणे साठा जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात अवैध बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
पिंपळगाव कोहळी येथील एका घरात बोगस बियाण्यांचे पॅकिंग करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी रविवारी (५ जानेवारी) जिल्हा भरारी पथक आणि कृषी विभागाने संयुक्तपणे मदन रामटेके यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी स्वतःच्या घरात धानाचे बियाणे पॅक करताना रंगेहात पकडला गेला.
तपासणी दरम्यान कृषी अधिकाऱ्यांना धक्कादायक बाबी आढळून आल्या. संबंधित इसमाकडे बियाणे उत्पादन किंवा विक्रीचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो २०१७-१८ सालचे म्हणजे तब्बल ८-९ वर्षे जुने प्रयोगशाळा अहवाल दाखवून त्यांची दिशाभूल करत असल्याचे उघड झाले आहे.
कारवाईदरम्यान आरोपीने पथकासोबत हुज्जत घालत सहकार्य करण्यास टाळाटाळ केली, तसेच पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यासही नकार दिला. मात्र, भरारी पथकाने आक्रमक पवित्रा घेत सर्व मुद्देमाल जप्त करून लाखांदूर पोलीस ठाण्यात जमा केला आहे. जप्त बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, विविध कलमान्वये आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक केंद्रांकडूनच बियाणे खरेदी करावे आणि पक्के बिल घ्यावे. कुणीही बोगस बियाण्यांची विक्री करत असल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा.’
कृषी विभाग, भंडारा